सीमोल्लंघन :मध्यप्रदेश -Heart of India (दिवस दुसरा)
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व इंदौर
26/10/2019 -दिवस दुसरा
आज सकाळी 9.30 ला उठलो.फक्त 4 तास झोप झाली. तितकी पुरेशी नव्हती पण गरजेची होतीच. बाकी दोघांना पण उठवले.निवांत आवरले व समोर असलेल्या एका हाॅटेलमध्ये नाश्ता करायला गेलो.इकडे इंदोरी पोहा फेमस आहे ऐकले होते.मग पोहेच ऑर्डर केले. इथे पहिल्यांदाच पोह्यामध्ये बडीशेप पाहिली.अजून कसला तरी फ्लेवर असावा पण; ओळखता आला नाही.छान होते चवीला.आवडलं.
तसं पाहायला गेलं तर पाककलेतील कांदापोहे ह्या पदार्थावर सगळ्यात जास्त प्रयोग होत असलेले दिसून येतात.नाव कांदापोहे पण हल्ली काळानुसार त्यात बटाटा,मटार इ दिसून येतंच. आधी पोटोबा मग विठोबा,ह्या न्यायाने पोट भरुन घेतले व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगकडे जाणा-या गाडीत बसलो.(आतापर्यंत घृष्णेश्वर,त्र्यंबकेश्वर,भीमाशंकर ही ज्योतिर्लिंगे झालीत.ह्या सहलीत अजून दोन होतील.) गाडी रिकामीच.पण वेळेवर निघाली.लेडीजसाठी उजव्या बाजूच्या सीट्स राखीव होत्या व हे कंडक्टर पुरुषांना उठवून लेडीजसाठी जागा करुन देत होते.
एका गाडीत 2-3 कंडक्टर(क्लिनर) दिसत होते(कसं काय परवडत असेल काय माहित राव?) ह्यांचा आपल्यासारखा सरकारी तोरा नाही व खाजगी असल्याचा माज पण नाही.इंदौर शहर सलग 4 वेळा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांकावर आहे व ते पावलोपावली दिसून येत होते.मानले बुवा इथल्या जनतेला.सलाम तुम्हाला!
ओंकारेश्वरला जाताना मध्यप्रदेशातील जमीन सपाट दिसली पण जसजसे दक्षिणेकडे जात होतो तसतसे घनदाट जंगल असलेल्या पर्वतीय(सातपुडा पर्वत)भागातून आमची गाडी वाट काढत होती.रस्ता एक नंबर होता.सनावदला पोचलो. तिथून पुन्हा दुसरी गाडी करुन ओंकारेश्वरला जावं लागते.मग गाडी येईपर्यंत तिथे हातगाडीवर एक काळ्या रंगाचे,रताळ्यासारखे कंद खाल्ले.(नाव विसरलो आता.)
15-20मिनिटांनी गाडी आली व बसलो.ओंकारेश्वरच्या बस स्टाॅपवर उतरलो व तिथून रिक्षाने नर्मदेकाठी आलो.मी पाहिलेली आतापर्यंतची सर्वात मोठी नदी होती ही.धन्य जाहलो.हर हर नर्मदे ! केबल ब्रीजवर फोटो काढले व पुढे गेलो.
मंदीर 5 वाजता उघडणार होते.नदीमध्ये बोटींग करायची इच्छा झाली.तिथल्या एकाला विचारले.बार्गेनिंग काय झालीच नाही. 200रुपयात चांगली फेरी मारुन झाली.थोडं फोटोसेशन करुन रांगेत उभा राहिलो.
15मिनिटांत दर्शन झाले.बाहेर आल्यावर देडे व किरणनी रस्सा वडा खाल्ला पण त्यांना त्यात मराठी चव नाही जाणवली.पुन्हा रिक्षा करुन बसस्टँडवर आलो. काळोख पडायला आलेला.अर्ध्या तासाने बस निघाली.आता परत जाताना लवकर पोचलो असं वाटलं. पुन्हा रिक्षा करुन आशिया खंडातील प्रसिद्ध अशा सराफा बाजारला आलो.
इंदोरची सगळी जनता इथेच दिसली.फुल्ल गर्दी.सोने-चांदी,कपडे,चपला,भांडी इ.च्या प्रत्येकी मोठमोठ्या गल्ल्या फिरुन पाहिल्या.पुण्यातील तुळशी बागेपेक्षा खूपच मोठी.मग
गुगलवरुन सर्च केलेलं सगळं खायला सुरवात केली; इतके की जेवलोच नाही. शिखंजी,खोप्रा पॅटीस,फरियाली साबुदाणा खिचडी,9फ्लेवर्सची पाणीपुरी,दही वडा,हाॅट डाॅग,बनारसी पान इ.(सुटले ना तोंडाला पाणी)
फिरुन फिरुन दमल्यावर,अडीच तीन तासानंतर काढता पाय घेतला.इतके खाल्लंय म्हटल्यावर जरा जिरवायला तर पाहिजेच ना.मग थोडं चालायला सुरुवात केली.चालताना डाव्या हाताला एक जैन मंदीर दिसले.म्हटलं दर्शन घेऊत.आत बरीच रेखाटलेली प्रसंगचित्रे पाहायला मिळाली. चालताना उजव्या हाताला एक गुरुद्वारा दिसला.आयष्यात कधी गुरुद्वारामध्ये गेलो नव्हतो म्हणजे जवळपास कधी दिसलाच नाही.योग पण नाही.आज वेळ आणि योग पण होता.पाय-यांवर आलो आणि जरा टेन्शन आलं.डोक्यावर घेतात तसलं रुमाल आपल्याकडे नाहीये.मग आपल्याकडील रुमाल वापरुन जायचे ठरले.थोडं पाय-या चढून वर आलो आणि रुमालांचा ढीगच दिसला. वाहेगुरु,तुस्सी ग्रेट हो!
पाया पडून खाली आलो व ओला'वर रिक्षा बोलवली.ड्रायव्हर भाई लय भन्नाट व्यक्तिमत्व.फोनवर गर्लफ्रेंडला बोलताना आमच्याशी पण संवाद चालू होता. स्वतः फुल स्पीडमध्ये गाडी चालवून रस्त्यात आडवे येणा-या जाणा-याला जोराने ओरडून त्याची आयमाय काढायचा हा बहाद्दर. लवकरच पोहचवले त्याने रुमवर(नशीब वर नाही). हातपाय धुतले व दिवसभराचा हिशोब केला.
वपुंनी सांगून ठेवलंय-खर्च केल्याचे दुःख नसते पण हिशोब नाही लागला की त्रास होतो.आमचेही व्हायचं असं कधीकधी.मग काय Round figure करण्याशिवाय पर्याय नसतो.मग फोटोंची(पुराव्यांची) देवाणघेवाण करत झोपी गेलो.
Comments
Post a Comment