५ रुपयांत ५ मिनिट

विसावा घेतानाAt the entrance of Megacityकालच्या रात्री(18-04-2017)
3 वर्षांपूर्वी कोल्हापूरला जायला निघालो होतो.आमचा जवाहर नवोदय विद्यालय,निजामपूर(रायगड) चा 11वी-12वी चा वर्गमित्र शिवप्रसादचे लग्न होते.शिवा म्हणजे नवोदयच्या सगळ्या मुलींचा 'दादा',11वीमध्ये असताना 'शिस्तप्रिय'Sports Captain आणि बरंच काही.आम्ही रात्री पुण्यातून निघणार होतो.
शैलेश पनवेलवरुन पुण्याला आला होता.मोहन अर्ध्या वाटेत शिरवळला(त्याच्या सासरवाडीला) आमची वाट पाहत होता.
मी एक पण लग्न अटेंड नाही केलंय,किशोर मला नक्की घेऊन चल असं म्हणणारा शिवाजी पण पुण्यात पोचणार होता.सगळे स्वारगेटवरुन निघणार होतो.शिवाजीला यायला उशिर झालेला.नंतर तर बहुतेक सर्व गाड्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने फुल्ल होत्या.2-3 गाड्या सोडल्या तेव्हा कुठे पिंपरी चिंचवड-पणजी गाडीमध्ये बसायला जागा मिळाली.मोहनचे फोनावर फोन चालूच होते-'कुठे आहात,निघालात काय,नसेल निघालात तर माझा मी जातो?'मग त्याला गाडी पंक्चर झाली,जेवायला थांबली अशी कारणे देऊन थांबवून ठेवलं.मेव्हण्याला घेऊन हायवेला 3तास वाट पाहत उभा होता बिचारा.पण गाडीला शिरवळचा स्टाॅप नव्हताच. मग शैलेशने तितक्या रात्री ड्रायव्हरची "चहापाण्याची" सोय केली व मोहनला आत घेतले.मस्त गप्पा मारत,गाडीतल्या बाकी लोकांची झोपमोड करत होतो. लग्नात मस्त धमाल करता यावी यासाठी पूर्ण झोप घेऊन फ्रेश असणे महत्वाचे होते.मग जाताना सातारमध्ये अलंकारच्या घरी  4-5 तासाची झोप घेऊन त्याला सोबत घेऊन लवकर निघू असे ठरले.तसे आम्ही त्याला सांगीतले पण.तो या म्हणला काही प्राॅबलेम नाही.त्याची झोप आम्हाला माहिती होती तो म्हणला,"नाही झोपणार मी.या तुम्ही."
पण आणेवाडीचा टोलनाका पास केल्यावर त्याला 7-8 काॅल केले पण गड्याने काय काॅल उचललेच नाही.
अलंकार मोक्याच्या वेळी गायब होणे,ही अलंकारची जुनी सवय आहे असं अजित म्हणतो त्याचा प्रत्यय दिसलाच. गाडी सातार स्टँडमध्ये आली.एक वाजलेला होता.खलबते सुरु झाली.मग ह्याच गाडीने कोल्हापूरला जायचे असं ठरलं.अलंकारला शिव्यांची लाखोली वाहून कोल्हापूरचे तिकीट काढले नि पुन्हा झोपलो.पण काही वेळातच आवाज आला-"चला कोल्हापूर...कोल्हापूर उतरणारे चला."
आम्हा सर्वांनाच गाढ झोप लागली होती.पण ड्रायव्हरला मानले पाहिजे गाडी पाऊणतास लवकर आणली होती.
त्यामुळे कोल्हापूर कधी आले काही कळालेच नाही.
मोहन तर ड्रायव्हरला म्हणाला की,"काय काका इतक्या जोरात गाडी पळवली तुम्ही,मस्त झोप लागली होती."किंबहुना आमच्याच मनातले बोलत होता तो.
आता आमच्यापुढे यक्षप्रश्न होता की,आता तर तीन वाजलेत.साडेतीन-चार तास घालवायचे कसे? कारण आसुर्ले-पोर्लेला जायला सकाळी 6.30च्या आसपास गाडी होती.मग महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन तिथेच फ्रेश होऊन परत स्टँडवर यायचे ठरले.google map वर लोकेशन सेट केल व चालायला लागलो.एव्हाना झोपेचा अंमल कमी झाला होता. पहाटेच्या गार वा-याने मस्त फ्रेश वाटत होतं. कोल्हापूर शहर अजून साखरझोपेतच होतं.आम्ही  गप्पा मारत निवांत चालत होतो.थोडं दमल्यासारखे झालो म्हणून एके ठिकाणी बूड टेकवले..तिथेच दोन फोटो काढले व चालू लागलो.मंदीर जसजसे जवळ येऊ लागले तसतशी लोकांची लगबग दिसू लागली.अंघोळ करुन दर्शन घेण्याचा प्रश्नच नव्हता कारण झोप पूर्ण झाली नव्हती व शिवाच्या घरी जाऊन पुन्हा झोपायचे होते.मग मंदीर परीसराच्या बाहेरील बाजूस एक सार्वजनिक शौचालय होते,तिकडे आम्ही मोर्चा वळवला.तिथं झालं काय, एक जण आत बसलेला होता व बाहेरचा माणूस सारखाच दरवाजा वाजवत होता(खरंच खूप इरिटेट होतं असं कोणी केलं तर,दिवसात मोजून खूप कमी वेळा आत्मचिंतन- प्रायव्हसी-डुलकी-नेक्स्ट प्लॅनिंग असा वेगवेगळा कार्यभाग ह्या छोट्याशा गुहेत साधक साधत असतो पण  हे रंभ/मेणक तपश्चर्या भंग करताना आपल्याला सार्वजनिक ठिकाणी नेहमी दिसतात .) तर असाच एक मेणक/रंभ आतल्या साधकाची तपश्चर्या भंग करत होता...
शेवटी साधक बाहेर आला व म्हणला,"काय राव पाच रुपये दिलेत,पाच मिनिट तरी सुखाने बसू द्यायचं की"??
खरं सांगतो, असला भारी डायलाॅग मी तर कधीच ऐकला नव्हता.खूप हसलो आम्ही...
मग हातपायतोंड धूवून देवीचे दर्शन घेऊन एस टी स्टँडकडे मार्गस्थ झालो.

Comments

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी