तीन वाटी पोहे व दहिवडीची ट्रेनिंग( 2016)
तीन वाटी पोहे व दहिवडीची ट्रेनिंग( 2016)
माझ्या दृष्टीने शेळीपालन,दूध व्यवसाय इ.शेतीपूरक व्यवसाय शाश्वत आहेत.त्यातल्या त्यात शेळीपालन मला बेस्ट वाटते.लोक काय मटण खायचे सोडणार आहेत का? नाही ना.मग सुरुवातीला 5-6 गोट फार्मला भेटी दिल्या.आपण B.Sc शिकलोय म्हणजे ह्यांच्यापेक्षा नक्कीच चांगला व्यवसाय-व्यवस्थापन करु शकतो, असा आत्मविश्वास आला. शेळीपालनचे सरकारमान्य ट्रेनिंग घ्यायचे ठरले.जोडीला अमोल व नितेश होतेच. मग ऑनलाईन माहिती घेतली .दहीवडीला येणा-या एप्रिलमध्ये 11-12-13 तारखेला प्रशिक्षण कालावधी होता. तिकडेच जाऊन सर्व फी व कागदपत्रे द्यायची होती. फलटणला मित्र रोहनच्या घरी दोन दिवस राहायची सोय होणार होती.कारण तिघांचा दोन दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च पाहिला असता दोन दिवस फलटण-दहिवडी-फलटण प्रवास करायला दोन बाईकना आरामात परवडण्यासारखे होते.
प्रयाणाचा मूहूर्त ठरला 11 तारखेला सकाळी 6 पर्यंत निघायचे.कारण ट्रेनिंगची वेळ 10पासून सुरु होती व आम्हाला 165किमी तीन तासात करायचे होते.शिवाय कार्यालयीन शिष्टाचार आटोपण्यासाठी लवकर पोचणे गरजेचे होतं.
नाश्ता करुन, घोटावडे फाट्यावरुन निघायला आम्हाला सकाळचे 7 वाजलेच.दोन्ही गाड्यांमध्ये 500-500रुपयाचे पेट्रोल टाकले आणि मग आम्ही कुत्रं मागं लागल्यागत गाडी पळवायला लागलो.मी कधी नितेशच्या गाडीवर(Unicorn) तर कधी अमोलच्या गाडीवर(Avenger) बसायचो.कारण फुकट नेत असताना पण एक ही फुकटा पार्टनर मिळाला नव्हता. जाताना रोहनला मिनिटभरासाठी भेटलो व दहिवडीकडे निघालो. जाताना लहान मोठे दर्रे,2-3 छोटेसे घाट लागले होते. दहिवडीच्या पुढे 2किमी अंतरावर सेंटर होते.
ट्रेनिंग सेंटरचा परिसर अवाढव्य होता.आम्ही 10.00ला पोचलो तेव्हा नोंदणीच चालू होती.मग सोपस्कार उरकून ट्रेनिंग हाॅलमध्ये आलो.हाॅल म्हणजे 15×20ची पत्र्याची रुम होती.तिथले प्रशिक्षक येडगे सर खूप छान माहिती देत होते.
3वाजता ट्रेनिंग संपले.मग तिथे आलेल्या बाकी विद्यार्थी मित्रांसोबत गप्पा मारायला सुरुवात केली.मग त्यांच्या बोलण्यातून कळाले की, एका मठावर राहण्या-खाण्याची मोफत व्यवस्था होईल.फक्त देवदर्शनासाठी आलोय हेच कारण सांगायचे.बाकी फिरायला-ट्रेनिंगला आलोय असले काही सांगायचे नाही.मग मठाच्या दिशेने निघालो.रोहन खूप फोर्स करत होता,घरी या म्हणून आम्ही म्हटले उद्या येतो.
हा बहुतेक सर्व भाग दुष्काळीच दिसत होता.उजाड-भकास दिसत होते सगळीकडे.
मठावर पोचल्यावर त्यांना सांगीतले दर्शनासाठी आलोय व उद्या शिंगणापूरला जाणार आहोत.मग प्रश्नमंजुषेत पास झाल्यावर त्यांनी आमची हाॅलमध्ये सोय केली.रुम मिळाली असती तर बॅग-मोबाईलचे टेन्शन नव्हते.हाॅलमध्ये 17 गावचे 17 लोक असतात. कोणावर कसा विश्वास ठेवणार .फ्रेश झालो व बाहेर टेरेसवर आलो.इथे आमच्यासोबत ट्रेनिंग घेणारे मयुरजी भेटले. त्यांच्याकडे खूप छान माहिती -अनुभव होता, A4 साईझची 300-400 पानी नोंदवही होती.त्यांनी 30-35 गोटफार्म पाहिले होते.त्यांचा मोबाईल नंबर घेतला.(अजून पर्यंत त्यांच्याशी कनेक्टेड आहे.हा लेख लिहितानाच्या संध्याकाळी 18-04-2020 त्यांच्यासोबत त्यांच्या भारत-नेपाळ दर्शन मोहिमेवर 2.5-3 तास चौफेर गप्पा मारल्या.) सांगायचा मुद्दा काय की Once Connected, Always Connected हे माझ्या मैत्रीचे एक तत्व पाळत असतो.
थोड्या वेळाने घंटा वाजली.संध्याआरतीची वेळ झालेली.चला म्हटले फुकट राहण्या- खाण्याची सोय होतेय तर आरतीला उभे राहायला काय हरकत आहे.खोटं नाही सांगत मी -माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी आरती होती.आता चरण संपले की आरती संपेल पण कसले काय?चरणावर चरण वाढतच होते. जवळपास सव्वा-दिड तास उभे राहून टाळ्या वाजवून दमलो बुवा...जेवणाला गेलो पण universal चव असल्याने तितके जेवण गेलं नाही.फक्त लाप्शीवर ताव मारला. जेवून पुन्हा गप्पा मारत बसलो.नितेश झोपला लवकर.मी आणि अमोल 3 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो.झोप नव्हतीच पण थोडी झोप पाहिजे म्हणून पडलो.सकाळी उठलो.आवरले.मंदीर परिसरात एक फेरफटका मारला व जायला निघालो.गाडीजवळ येऊन बघतोय तर काय दोन्ही गाड्यांमधून पेट्रोल चोरलेलं स्पष्ट दिसत होतं.पाईप निघालेला,पेट्रोलचे डाग पडलेले दिसत होते. तेथील व्यवस्थापकांसोबत बोललो तर ते म्हणाले की,ती आमची जबाबदारी नाही, असे सांगून हात झटकले.प्रत्येकी फक्त अर्धा-1 लिटर पेट्रोल शिल्लक असेल.फलटण ते दहिवडी असे पेट्रोल वाचवण्याच्या नादात 400-500रुपयाचे पेट्रोल चोरीला गेलेलं.रोहनच्या घरो गेलो असतो तर परवडले असते असं वाटले. पण काय करणार अनहोनी कोई टाल सकता है क्या?
नाश्ता करुन ट्रेनिंगला जायचे होते.काल दुपारी तर जेवलोच नव्हतो अन रात्रीचे जेवण आमच्या माजो-या जिभेला आवडले नव्हते.खूप भूक लागलेली.मग दहिवडीच्या
एस.टीच्या कॅन्टीनला आलो.3 प्लेट पोहे ऑर्डर केले.पण पिंट्या प्लेटऐवजी वाटीमध्ये पोहे घेऊन आला.पहिल्यांदाच हाॅटेलात वाटीमध्ये पोहे पाहत होतो.खूप हसलो.त्याला विचारले असं का? तर म्हणला, "प्लेट धुवायला आहेत".. पोहे छान होते.पुन्हा त्याले बोलावले व आताची ऑर्डर "तीन वाटी पोहे" अशी दिली,तसा तो पण हसला.
आजचे ट्रेनिंग झाले.रोहनला फोन करुन दहिवडीला बोलवलं होतं.तो आमचीच वाट पाहत होता.मग शिखर शिंगणापूरकडे मोर्चा वळवला.काय तो दुष्काळी भाग. जाताना रस्त्याच्या कडेला
एका गावाच्या नावाचा फलक होता पण जिथवर नजर जाईल तिथवर साधं एक घर पण दिसेना इतके भकास व भयाण वाटत होतं. कसे राहत असतील इथले लोक?मन मुळशी तालुका व माण-खटावची उगाचंच तुलना करु लागलं. राजकारणामुळे हा भाग दुष्काळी राहिला हे कळालं. शिखर शिंगणापूर आलं.हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत.शंभू महादेवाचं दर्शन घेतले.मंदीराच्या दरवाजावर इतकं सुरेख कोरीव काम कुठेच पाहिले नव्हते.मी पाहिलेलं ते पहिले हेमाडपंती मंदीर. प्रेमातच पडलो मी ह्या मंदीराच्या.त्यानंतर 4-5 वेळा पाहिले.
.तिथून गुप्त शिवलिंगकडे जायला निघालो.जाताना एवढ्या प्रवासात पहिल्यांदाच रस्त्याच्या कडेला झाडे दिसली.तिथे लाकडी घाण्यावरचा उसाचा रस प्यायलो.रोहनने औपचारिकता केली.छान रम्य परिसर आहे हा.दर्शन घेऊन फलटणकडे निघालो.घरी आलो,मस्त फ्रेश झालो.नाश्ता करुन फलटण शहरात आलो.येथील श्रीराम मंदीर पाहिले.छत्रपती संभाजी महाराजांचे बारसं ह्याच मंदीरात झालं होतं.लाकडाचा अप्रतिम वापर केलेला दिसतो.शेजारीच असलेला निंबाळकरराजेंचा राजवाडा बाहेरुन पाहायला मिळायला.चौकात असलेलं श्री जबरेश्वर मंदीर पाहिले.एकाच दिवसात हेमाडपंती कलाकृतीचा हा दुसरा नमुना पाहायला मिळाला.मंदीराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मूर्ती म्हणजे काही प्रमाणात दुसरे खजूराहोच म्हणता येईल. हे तिथल्या एका जाणकार काकांनी पटवून दिले व फलटणचा इतिहास उलगडून सांगीतला.
आज खरंच खूप भारी वाटले की, आज पुन्हा एकदा इतिहासाला स्पर्श करता आला.मी तर मंतरलेल्या अवस्थेतच घरी आलो.जेवलो गप्पा मारल्या व झोपलो.सकाळी लवकर उठलो. आज ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता.अंघोळ करुन बसलो पण रोहन काय निघू देईना.थांबा चिकन शिजतंय.तो पर्यंत Hollywood movie पाहत बसलो. जेवण खूप छान झालेलं.जेवताना त्याने इतके बळजबरीने चिकन वाढले की अतिशयोक्ती नाही करत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मी चिकन खात होतो.थोडा उशीर झाला होताच निघायला.सर्वांचा निरोप घेऊन निघालो.पाऊण-एक तास उशीर झालेला.वाटेत अल्कोहोल (ऊसाचा रस) प्यावंसं वाटलं.रस पिऊन झाला.मी 50रुपयाची नोट त्या काकूंना दिली.त्यांनी मला 26रुपये परत दिले.मला वाटले कदाचित काकू शिकलेल्या नसाव्यात, हिशोब चुकला असेल. त्यामुळे मी म्हटले,"काकू तुम्ही जास्त पैसे दिलेत."काकू-नाही 8रुपयाने 24रुपये होतात."मला थोडं आश्चर्यच वाटले कारण आमच्याकडे(मुळशीला) 12रुपयाला ग्लास आणि हा दुष्काळी भाग असून फक्त 8 रुपये...आणि असं पण नाही की ग्लास अगदीच छोटा होता.चांगला मध्यम आकाराचा होता. ह्यावरच चर्चा करत ट्रेनिंग सेंटरवर आलो. आज 2 वाजता ट्रेनिंग संपले. एक जण म्हणला, रहिमतपूरजवळ चांगला गोट फार्म आहे तो पाहूयात का? रहिमतपूरला जायचे म्हणजे घरी जाताना आल्या मार्गे फलटणवरुन न जाता सातारमार्गेच जावं लागेल.म्हटले चला तेवढाच हा जिल्हा पाहून होईल.
जाताना वडूज, औंध लागले. संग्रहालय पाहायची खूप इच्छा झालेली पण चहापेक्षा जास्त वेळ नसल्याने विचार झटकावा लागला.(त्यानंतर एकदा मार्च 2018 मध्ये रोहनसोबत गेलेलो पण तेव्हा बंद होते व डिसेंबर 2019 मध्ये शैलेशसोबत असताना त्याने उशीर होईल म्हणून नाही नेलं.अजूनपर्यंत तरी ते संग्रहालय पाहायचा मूहूर्त काही मिळाला नाही😥)ह्या प्रवासात एक फरक लगेच जाणवला की, हा माणदेशी भाग दुष्काळाच्या छायेत आहे तर कोरेगाव तालुका ऊसाने हिरवागार.थोड्याच अंतरावर ही विरुद्ध परिस्थिती दिसून येते.
गोट फार्म पाहिले.तिथे एक १०० किलोचा बीटल जातीचा काळा बोकड अगदीच शांत दिसत होता.बीटल जात शांतच असते हे कळाले.तसा १००किलोचा बोकड पहिल्यांदाच पाहत होतो म्हणा.
मग सातारा हायवेला लागलो.थंडा प्यायलो. तिथून गाडी डायरेक्ट कैलास भेळलाच थांबवली.जबरदस्त चव आहे इथली.नक्की ट्राय करा.
साधारणतः ८ च्या आसपास तिघेही सुखरुप घरी पोचलो.
Comments
Post a Comment