उत्पत्ती एका शब्दाची
उत्पत्ती: एका शब्दाची
माझा जन्म 90च्या दशकातला. त्यामुळे आमच्या इंग्रजीला Johny johny,Baba blackship अशाच कवितांपासून सुरुवात झालेली.मला आठंवतंय की,मी प्राथमिक शाळेत ४थीला होतो तेव्हापासून आम्हाला इंग्रजी भाषा अभ्यासक्रमात आली.५वीला असताना हायस्कूलमध्ये प्रवेश झाला.तिथे आम्हाला गणित विषयाचे कांबळे सर काहीच दिवसांसाठी इंग्रजी शिकवायला होते.त्यांचा स्पेलिंग पाठ करवून घेण्यावर चांगलाच जोर होता. फक्त Conversation ची स्पेलिंग येत नव्हती म्हणून विनय व कणाद सोडून(टाटा इंग्लिश स्कूल,भिरा मधून आलेले)माझ्यासकट सर्वांनी 2-3 वेळा मार खाल्लेला.तेव्हापासून ठरवले की इंग्लिश सुधरवायचेच.त्यानंतर इंग्लिश सुधारण्यावर इतके कष्ट घेतले की १०वी पर्यंत इंग्लिश विषयामध्ये साधं घटक चाचणीला पण मी कोणालाही माझ्यापुढे जाऊ दिलेलं आठवत नाही.अर्थात माझ्या इंग्लिश सुधारणेचं श्रेय मी कांबळे सरांनाच देत आहे.
अशाच एका सुधारणेचा एक भाग म्हणजे ७वी-८वी ला असेन मी,तेव्हा नम्रताताईकडे इंग्रजीच्या शिकवणीला जायचो.सोबत कणाद पण असायचा. एकदा ताईने Letter Writing साठी विषय दिला की,"तुम्हाला तुमच्या भावाच्या साखरपुड्याला जायचे आहे व त्यासाठी शाळेला सुट्टीसाठी अर्ज करायचा आहे."
एवढे सांगून ती घरात गेली.आधी शिकविल्याप्रमाणे पत्राचा ठरलेला साचा पाठच होता पण साखरपुड्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते कळेनाच.मी कणादला म्हटले," हे बघ साखरपुडा ह्या शब्दातील साखरेला Sugar व पुडा म्हणजे Box म्हणतात.मग sugar आणि box एकत्र केल्यावर Sugar box बनते "त्यालाही ते पटले असावे.मग आम्ही साखरपुडा म्हणजे SugarBox असे लिहून टाकले. थोड्याच वेळात ताई आली.तिला आम्ही पत्र दाखवले.तिने कपाळावर हातच मारुन घेतला.म्हणाली "Sugarbox हा शब्द कुठे वाचला तुम्ही?" मग आम्ही तिला शब्दाची फोड करुन सांगीतली.तशी ती हसायला लागली.कदाचित तिला आमचे 'निरागस इंग्रजी'दिसले असावे.मग तिने साखरपुड्याला Engagement म्हणतात,असे सांगीतले व प्रत्येक वेळी शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, हेही सांगीतले.
हल्ली मी Sugarbox हा शब्द मित्रांमध्ये गमतीने वापरत असतो.एखादा निरागस असेल तो शब्दाची फोड करुन अर्थ मिळवतो तर काहींना Bounce होतो.
Comments
Post a Comment