रायगड जिल्हा दर्शन मोहिम:दिवस पहिला
Welcome
रायगड जिल्हा दर्शन मोहिम: दिवस पहिला(आणि रात्र पण पहिलीच)
काल लोहगड-कार्ला-भाजे करुन रुमवर यायला 10 वाजलेले.खूप दमलेलो.त्यामुळे उठायला उशीर झाला आणि पहिल्याच दिवशी प्लॅनिंगला सुरुंग लागला. 6 वाजता निघायचा Plan होता(कारण दुपारचे ऊन टाळून आराम करण्यासाठी पहाटे जास्तीतजास्त घोडदौड करायची) पण प्रत्यक्षात पुण्यातून निघताना 8 वाजले.चक्क 2 तास लेट होतो आम्ही;6-7दिवसाचा प्लॅन आहे; 8-10 दिवस लागतील की काय अशी शंका चाटून गेली.
वनाझला नाश्ता केला आणि ठरल्याप्रमाणे बोर घाटाऐवजी बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन श्रीगणेशा करावा म्हणून ताम्हीणी घाटाकडे कूच केली.मे महिन्यातील सकाळी 9चे ऊन पण लय कडक होते.चांदणी चौक(CC) मध्ये गाॅगल घ्यायला थांबलो.आमच्याकडे सुट्टे नव्हते.त्यात 15-20मिनिटे गेली.पिरंगुट आलं आणि मी तोंडाला रुमाल बांधला कारण घरच्यांना/नातेवाईकांना दिसायचे नव्हते. बरं झालं कोणी पाहिलं नाही. नाय तर माझ्या ट्रीपला सुरुंग काय घेऊन बसलात चांगला अणुबाँबच लागला असता.कारण काय तर मी घरी सांगीतले नाही की 6-7दिवस उनाडक्या करायला चाललोय ते.पुढे आकरे सरांकडून दुर्बिण घ्यायला थांबलो.बिचारा माणूस सकाळच्या 7 पासून आम्हाला दुर्बिण द्यायला तरसत होता.पण त्या 'खेळण्यातल्या' दुर्बिणीने काही दिसले नाहीच.शिवाय एक सोडून दोन वागवायला लागल्या.ताम्हीणी अभयारण्यातला प्रवास प्रवास संपूच नये असे वाटत होतं.+ व्हॅलीमध्ये वजाबाकी केली आणि थोड्याच वेळात बाॅर्डरवर जाऊन पोचलो.
बाॅर्डर म्हणजे पुणे-रायगड जिल्हा हद्द.सीमेवर एक हिरो स्वागत करायला होताच.त्याच्यासोबत फोटो घेतला आणि वैशाखात 'सीमोल्लंघन' केलं.जेव्हा तुम्ही ह्या बाॅर्डरवर याल तेव्हा पहिला फरक हा रस्त्याच्या क्वालीटीमध्ये दिसेल.अर्थातच रायगड हद्दीतील रस्ता भारीच होता.दुसरा फरक, घाट उतरताना, हवेच्या तापमानातील फरक आरामात जाणवेल.त्यावरुन तुम्हांला खरंच जाणवू लागेल की,आपण असल्या उन्हाळ्यात कोकणात आलोय आणि आता आपलं काही खरं नाही.सुधागड अभयारण्यातून थेट पालीला आलो. इथे अष्टविनायक गणपती बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.(मूर्तीच्या डोळ्यांत व बेंबीमध्ये असणारे हिरे नक्की पाहा.)मग जरा पोटोबा केला. उन्हेरेच्या गरम पाण्याचे कुंड पाहायचे लक्षातच आले नाही.तसं ह्या कुंडात मी 4-5 वेळा अंघोळ केलीये पण पार्टनरने मिस केले.
चावणीचे स्मारक पण राहिलं. मग आलो खोपोलीला.डाव्या हाताला Imagica खुणावत होतंच पण वेळ नव्हताच. दुसरा अष्टविनायक गणपती वरदविनायकाचे दर्शन घेतले नि पेणच्या दिशेने निघालो. जाताना पाताळगंगा नदी सोबतीला होती.म्हटले नदीतच आपला Imagica होऊन जाऊदे गड्या.मनसोक्त भिजलो.अहा!पाण्यात भिजल्यामुळे असल्या उन्हात प्रवास करुन आलेला शीण बराच कमी झाला. गागोदेच्या अलिकडे रानसाईला मागचा टायर पंक्चर झाला.बरं गावातच होतो नाय तर बराच लांब धक्का द्यावा लागला असता. अर्ध्या पाऊण तासात सुटलो पण पहिल्याच दिवशी गाडीने दगा दिलता आणि अजून 5-6 दिवस बाकी आहेत.त्यामुळे मनात शंकेचं वादळ येऊन गेलंच.पुढे
पेण रस्त्यावर गागोदे नावाचं एक गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे.आचार्य विनोबा भावे यांचे गाव.लहानपणी आम्ही 3री/ 4 थीला असताना विनोबाजींचा धडा होता 'देतो तो देव' तेव्हापासून गागोदे माहित होते.त्यांच्या घरी गेलो. घर पाहिले.तिथे असणा-या सर्वोदयी मावशींनी माहिती दिली. त्यांचा निरोप घेउन निघालो.
"आपण वाचलेल्या
पुस्तकातल्या स्थळ- व्यक्तींना प्रत्यक्षात भेटल्याचे फिलींग खरंच खूप भारी असतंय."
Must Try .
कोकणी घराचा हा नमुना कदाचित देडे सरांनी पहिल्यांदाच पाहिला असेल.आचार्यांचा निरोप घेऊन अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झालो. संध्याकाळची वडखळची ट्रॅफिक डोकं खायला होतीच. खाडीच्या पूलावर फोटो काढले व सनसेट पाहण्यासाठी घाईने अलिबागमध्ये आलो.पण माझ्या पोटाने दगा दिला आणि आमचा सनसेट हुकला.मग असंच बीचवर फिरत बसलो. राहायचे कुठे तर देडे सर म्हणले,"आमचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे राहूत."मी नको म्हटले.पण तेच म्हणले की," नातेवाईक आता उपयोगी पडणार नाहीत तर कधी ?चला रुमचे आणि जेवणाचे पण पैसे वाचतील."म्हटले चला.
ह्या चर्चेत वेळ गेला आणि थोडं नुकसान करुन घेतले(काय ते नंतर सांगतो.)पाहुण्यांनी खास माणूस पाठवलेला पिक करायला.फ्रेश झालो पण पाहुणी म्हणाली की जरा लवकर काॅल केला असता तर मासे घेतले असते(हेच ते नुकसान)....आता काय तरी शाकाहारीच.कसं आहे ना कोकणात येऊन शाकाहारी जेवायचे म्हणजे विचित्र गोष्ट वाटते मला. मासे नाय भेटले की शिमगाच.
त्यात असे फुकटचे मासे मिस करणे म्हणजे महापापच.
म्हणून चर्चेत जास्त वेळ घालवू नये.लवकर निर्णय घेतल्याचा फायदाच असतो.मस्त जेवलो.आमची सोय बेडरुममध्ये केलेली(कदाचित घामाचा वास टाळण्यासाठी).
आजच्या दिवसाची उजळणी केली.
Petrol -390
ऊसाचा रस-30
Breakfast -70
Lunch-240
Parking -30
मी आत्मचिंतन केलं-
'उन्हेरे आणि चावणी miss झाले.
आज कुलाबा किल्ला पाहून व्हायला हवा होता. अंदाज चुकताहेत.वेळ वाया जायला नको.पार्टनर आपल्या भरवश्यावर फिरायला आलाय.त्याला इकडचे काही माहित नाही.ह्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला नको.spot झाले miss तर झाले एवढा काय लोड घ्यायचा.Enjoy Yaar !
क्रमशः.....
Comments
Post a Comment