उनाडायची प्रेरणा
लहानपणी शाळेत असताना वार्षिक सहली जायच्या.ब-याचदा बाहेरच्या जिल्ह्यातच जायच्या.आमची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की घरचे मला सहलीला पाठवू शकतील. फक्त सातवीला असताना एकदा सातारा- सांगली- कोल्हापूरला सहल गेलती तेव्हा गेलेलो.दहा वर्षात फक्त एकदा.सहलीवरुन आलेली मुले मजामस्तीचे अनुभव, पर्यटन स्थळाबद्दल सांगायचे.त्यांच्या आनंदात सहभागी होत असलो तरी माझ्या बालमनाच्या पटलावर "सहलीची खंत" टोचत राहायची आणि मग मी स्वतःला समजूत घालायचो की आपण खूप फिरायचे,जेवढे शक्य होईल तेवढे फिरायचे.
गाडीवर /गाडीत बसलो की उतरुच नये असं वाटते.
माझ्या फिरण्याच्या सवयीत एस.टी बसचा आणि पासचा खूप मोठा वाटा आहे.एसटी मध्ये खिडकी मिळवण्यासाठी मी लहान मुलांप्रमाणे धडपडत असतो.सॅकमध्ये शेजारी बसणा-यासाठी काही ना काही खाऊ ठेवतच असतो.मला लहान मुले व म्हाता-या माणसांसोबत गप्पा मारायला खूप आवडते.मुलांसोबत त्यांच्या छंद व करियर विषयक जाणून घ्यायला आवडते तर आजीआजोबा आपल्या मुल-नातवांबदल,शेतीबद्दल भडभडून बोलतात.
समजा एखादा लयच 'बोअर' असेल तर कानात काॅड टाकून मस्त बाहेर डोकवायचे.मी ब-याचदा खोटं बोलूनच फिरायला गेलो आहे.मे 2018 मध्ये तर 6 दिवस घरी न सांगताच रायगड जिल्हा फिरायला बाईकवर गेलतो.
एप्रिल 2016 मध्ये शैलेश बापू नितेश मनोज अमोल व मी मिळून सिक्कीम नेपाळ व भूतानचा प्लॅन बनवला.रिझर्वेशन पण केलं पण दोघांच्या घरात लग्न निघाली व ट्रीप बारगळली.शैलेश माझा चांगला Travel buddy आहे.आम्ही दोन वेळा गोवा व राज्यात बरीच भटकंती केलीये.मला गाडी चालवता येत नसल्यामुळे माझ्यासोबत जो असतो तो गाडी चालवायला लय वैतागतो.शिवाय लांबचा पल्ला पण मारता येत नाही.
मे 2018 मध्ये रायगड जिल्हा आणि रत्नागिरीतील दापोली व मंडणगड तालुके फिरलो.तिकडून आल्यावर रत्नागिरी जिल्ह्याचा प्लॅन बनवला व 20 ऑक्टोबरला जायचे निश्चित केलं.पण 4तारखेला भावाने त्याच्या कंपनीत मुलाखतीला पाठवले.आजपावेतो रत्नागिरी जिल्हा अजूनपर्यंत मला खिजवतोय.तीन वेळा गोव्याला गेलतो.आता 2-3 दिवस गोव्यात मुक्काम केला की गोवा राज्य पूर्ण होईल.
2019च्या सप्टेंबरमध्ये चार दिवस गुजरात व दिवाळीत मध्यप्रदेशात तीन दिवस भटकंती झाली.
फेब्रुवारी 2020मध्ये मी व धनंजय छत्रेनी सिक्कीम व भूतानची ट्रीप प्लॅन केली.सर्व बुकींग पण केलं आणि कोरोनाने शेण खाल्लं आणि फियास्को झाला.
कंपनीने 50दिवस लोणंद(सातारा)येथे कामासाठी पाठवले.
जवळपास 70%सातारा जिल्हा फिरुन झाला.मार्च 2022
सोशल व्हिजन संस्थेच्या प्रोजेक्टमुळे दिल्ली,हरियाणा,पंजाब फिरायला मिळाले,थोडक्यात पाकिस्तान हुकले.लगेच
एप्रिल 2022मध्ये ओडिशा,कोलकाता,बिहार,उत्तरप्रदेश पाहायला मिळाले.
आता इतका फिरलोय(इतरांपेक्षा तसा कमीच) की ती खंत राहिली नाही पण ह्या खंतेने उनाडायची प्रेरणा तर दिलीच शिवाय सवयदेखील लावली.
फिरताना काहीतरी ध्येय घेऊन भटका.जसे-12 ज्योतिर्लिंग, राज्य,देश, किल्ले,लेण्या .
मी तर ठरवलंय की,माराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा व भारतातील संपूर्ण राज्य फिरायचे.संपूर्ण भारत फिरायला आयुष्य कमी पडेल.त्यामुळे भूतान-नेपाळसारखा देश फिरायचा, म्हणजे अभिमानाने सांगता येईल की,अख्खा एक देश फिरुन झालाय.
सहज 2 वेगवेगळ्या Tour Agencyचे दिल्ली,पंजाब,SoU गुजरात,कोलकाता,ओडिशा,बिहार चे Packages पाहिले.भाई,खोटं नाही सांगत 1,30,000रु.वाचवले मी.
ते पण 2 महिन्यात.
I am really proud of myself.
Comments
Post a Comment