टक्कल

टक्कल करण्याचे फायदे व तोटे :
-आरश्यासमोर सारखे न्याहाळण्याचा वेळ कमी होतो.
-डोकं एकदम हलकं होतं.
-केस नसल्याने डोक्याचा सूर्यासोबत डायरेक्ट संपर्क येतो व डोकं तापते.
-टोपीचा खर्च वाढतो व तीची काळजी लागून राहते.
-सलूनमध्ये कटींगचा किमान दोन-तीन महिन्यांचा खर्च कमी म्हणजे शून्य इतका होतो.
-कटींग साठी नंबर लावावे लागतात तो वेळ वाचतो.तिथे नंबर असल्यास  गप्पा मारताना होणा-या चहापाण्याचा खर्च पण कमी होतो.पण गल्ली ते दिल्ली चे analysis लवकर मिळत नाहीत.
-केसांसाठीचा तेल,कंगवा,कंडीशनर, शाम्पू,साबण,जेल,डाय इ.खर्चात खूप मोठी बचत होते.
-सासरवाडीला न जाण्यासाठी हे एक उत्तम कारण देता येते.
-बायकांना आपल्या टकल्या नव-याला तरुण मुली आणि बायांची 'नजर' लागणार नाही,म्हणून निश्चिंत राहतात,तर टकल्यामुळे मुली -बाया पटायचे राहूद्या ढूंकून पण पाहणार नाहीत, याचे टेन्शन तमाम पुरुषांना असते.
-चेहरा धुताना तो टकल्यावरुन मानेपर्यंत धूत आणावा लागतो.
-मच्छरांना चावण्यासाठी एक नविन  निर्धोक प्लॅटफाॅर्म मिळतो.
-स्वतःच्या टकल्यावर तबला वाजवण्याचा फील घेता येतो व दुस-यांनाही देता येतो.
-खिशात कंगवा ठेवण्याची गरज नसल्याने तो हरवण्याचीही चिंता नसते.
-पाण्याची बचत होते.
-टक्कल केल्याने ब-याच नविन टोपण नावांना सामोरे जावं लागते.
उदा:टकल्या,टकलू हैवान,चमण.
-टक्कल केल्याने डोक्यातील कोंडा व ऊवा नाहिशा होतात.

 *माझे टक्कल* 
मार्च 2020मध्ये कोरोनामुळे लाॅकडाऊन होते.जवळपास सगळेच व्यवसाय बुडाले.माझा एक समज होता की,हेअर कटींग व्यवसाय हा कधीही न बुडणारा व्यवसाय आहे. पण  लाॅकडाऊनने तो ही  गैरसमज दूर केला.
27मे 2020 रोजी मी माझ्या आयुष्यात पहिले टक्कल केलं.सलून बंद असल्याने केस कापले नव्हते. केस जास्त वाढले होते व डोक्यात थोडा कोंडा होता,एवढेच कारण. लहान असताना आठवीपर्यंत पप्पा सोबत यायचे व न्हाव्याला सूचना करायचे की बारीक केस कापा म्हणून.बारीक केस कापल्यावर मला  वाईट वाटायचं.
टक्कल केल्यावर मी विचित्र(विद्रुप?) दिसेल म्हणून मी टक्कल करायचा विचार पण शिवला नाही.पण ह्या वेळेस ठरवलेच की,टक्कल करायचेच.मी आरशामध्ये  माझ्या डोक्यावरचे केस वस्त-याने अलगद निघताना पाहिलं.ते पाहून काळजात एकदम चर्र झालं.एके क्षणी  तर मलाच मी विद्रुप भासू लागलो. उगाच 28 वर्षांची तपश्चर्या मोडली असं वाटू लागले.मग तेव्हा विचार आला की, कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान ह्या समस्येला तोंड द्यावंच लागते.केस विंचरताना  केसांचा पुंजकाच अलगद निघून येतो,केस गळून पडतात. पुरुषांचे अशा आजारपणात टक्कल होणे वेदनादायी व दुःखदायक तर आहेच पण मुली-महिलांच्या बाबतीत खूपच वेदनादायी,दुःखदायी व संवेदनाक्षम आहे. केसांमुळे सौंदर्याला खरा अर्थ असतो,विशेषतः स्त्रीयांच्या.
माझ्या आत्याला ह्या त्रासातून गेलेलं पाहिलंय.
टक्कल केलं तेव्हा मी ठरवले की,आपण ह्या सर्व कॅन्सरग्रस्तांना मदत तर करु शकत नाही.मी मुलगी असतो तर केस दान पण केले असते.
जीवितमृत कॅन्सरग्रस्तांनी कॅन्सरसोबत केलेल्या शारीरिक व मानसिक संघर्षाला सलाम म्हणून मी दरवर्षी माझे टक्कल करण्याचे ठरवले आहे.
मला माहित आहे की ह्याने काही होणार नाही पण मला त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची जाणीव नक्की होत राहील.
ह्या जाणीवेतून 2021मध्ये 6 जून ला मी माझे पहिल्यांदा टक्कल केलं आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुळशीतील सौंदर्यरत्ने-Tourist Spots in Mulashi Taluka

रायगड जिल्हा दर्शन मोहिमेची पार्श्वभूमी