ती एक रात्र
एप्रिल 2012 मधील घटना आहे ही.
माझी B.Sc Third Year ची शेवटची परीक्षा होती.परीक्षा ज्या दिवशी संपत होती त्याच्या दुस-या दिवशी हेमंतच्या बहिणीचे लग्न होते.
फक्त परीक्षाच नाही माझी काॅलेज लाईफ पण पण संपली होती. लग्नाच्या निमित्ताने रिफ्रेशमेंट मिळणार होती;नविन जिल्हा,नविन प्रदेश. ठरवले की लग्नाला जायचंच.
हेमंत म्हणालेला की- पुण्यातून नांदगावला यायला 7 तास लागतात.लग्न सकाळी 11वाजता आहे.त्यामुळे तू आदल्या दिवशीच निघ. अलंकार पण निघणार आहे.
पण तो रेल्वेने जाणार होता.
मला रेल्वेपेक्षा एसटी मध्ये कंफर्ट व सेफ वाटते.त्यामुळे मी अलंकारला नाही म्हटले.
आदल्या दिवशी मी बोटा या गावी माझ्या चुलत मामाच्या गावी मुक्काम करुन एकूण प्रवासातले 3.30तास मी कव्हर करणार होतो व बाकी प्रवास दुस-या दिवशी करणार होतो.
ह्या चुलत मामाकडे मी कधी गेलो नव्हतो.घरचे जाऊन आलेले होते.माझी त्यांच्याशी ओळख होईल म्हणून मी माझा मुक्काम बोट्याला करायचा ठरवले .घरचे बरेच दिवस झालेले बोट्याला जाऊन आलेले.त्यांना पण बरं वाटले की मी जातोय म्हटल्यावर.पप्पांकडून त्या दोन मामांचे फोन नंबर घेतले.बॅग वगैरे रात्रीच भरुन ठेवली.
सकाळी उठून पेपरला आलो.पेपर झाल्यावर सगळ्यांचा निरोप घेतला.हर्षद मला सोडायला शिवाजीनगरला आला.लवकर जायचे म्हणून मिळेल त्या गाडीने जायचे ठरवले.पहिले मंचर,मग तिथून नारायणगाव,मग आळेफाटा,तिथून मग बोटा असं गाड्या बदलत बदलत मजल दरमजल करत रात्री 10.30वाजता बोटा गावात उतरलो.
फोन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करुन आणलेले केले डायल.पण दोन्ही फोन लागेनात.पुन्हा पुन्हा केले पण दोघांचे पण दोन्ही फोन बंद.माझ्या तर कपाळातच !समोर एक पान टपरी होती.तिथे गेलो विचारपूस करायला.त्यांना म्हटले-वामन साळुंखे कुठे राहतात.
तो-नाही माहित.
मग इकडच्या तिकडच्या,कामाच्या लिंक जुळवल्या तरी पण 50% खात्री देता येत नव्हती.टपरीवाला म्हणला तिकडे जाणारं कोणी ओळखीचे दिसले तर पाठवतो.मग अशाच गप्पा मारत बसलो.पप्पांचा काॅल येऊन गेला.त्यांना उगाच काळजी लागून राहायला नको म्हणून थाप मारली की टपरीवाल्याच्या घरी जातोय.असंच गप्पा मारता मारता
12.30वाजले. टपरीवाला म्हणला -मी तर निघतो आता.तू काय करशील?
मला वाटले हा मला त्याच्या सोबत नेण्याच्या विचारात दिसतोय.
मी-काय करु?
तो-'ही बोलेरो गाडी माझ्या चुलत भावाची आहे.रात्र काढ कशीतरी, सकाळी पाचला येतो मी.'
मी गाडीचा दरवाजा उघडला व आत जाऊन बसलो.काच लावून घेतली की गुदमरायला व्हायचे आणि काच खाली घेतली की मच्छर चावायचे.शिवाय गाडीमालकाला माहित नव्हते मी कोण आहे ते.चोर समजून मारायची भिती पण होतीच.
ह्या खेळात कधी डोळा लागला काय कळालंच नाही.पाच वाजता जाग आली. उठून टपरीवाला कधी येतोय त्याची वाट पाहत बसलो.5.15ला आला.मी त्याच्याकडे गेलो.तोंड धुतले त्याला पुन्हा एकदा कसं जायचे ते विचारलं.पौर्णिमेच्या चंद्राचा उजेड अजून होताच.पूल ओलांडून पलिकडे आलो.तिथली कुत्री भुंकायला लागली.हातात दगड घेतला व चालू लागलो.सुदैवाने हल्ला झाला नाही.दोन-चार मिनिटांत एक बाईकस्वार आला.त्याला हात केला व मामाचे नाव सांगितले.त्याने घरापासून 100मीटर अंतरावर सोडले,घर दाखवले व निघून गेला.मी घराजवळ आलो.मामीने अंघोळीचं पाणी तापवलेलं व दात घासत होत्या.त्यांना माझ्या सख्या मामांची ओळख सांगितली.मग त्यांनी विचारपूस केली.रात्री कुठ होता म्हणून?मग मी त्यांना खर काय ते सांगितले.अंघोळीचा पहिला नंबर माझाच लागला.तसाच निघणार होतो पण नाश्ता करुनच जा असा आग्रह केला.मग नाश्ता करुन निघालो. निघताना मामांचे चालू असलेले नंबर घ्यायला विसरलो नाही. मामा स्टँडवर आलेला सोडायला.8.30वाजता संगमनेर गाडी मिळाली.10च्या आसपास संगमनेरला उतरलो.लग्न वेळेत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. विचार केला आल्यासारखे मित्राला भेटूत, फिरुन घेऊत.नांदगाव गाडीची चौकशी करायला गेलो.10वाजताची नांदगाव गाडी अजून आली नव्हती.ती 11वाजता आली.गर्दी खूप होती.गाडीत जागा मिळेल म्हणून पटकन घुसलो पण जागा काय मिळाली नाय.त्यात गंमत अशी की,कंडक्टर ड्रायव्हर एक तासाने गाडीत चढले.एप्रिलचा महिना,माझ्याप्रमाणेच बाकी सर्व घामाजळेले.गाडी 12वाजता निघाली.
बरं वाटले.नांदगावच्या अलिकडे अर्धा तास आधी बसायला जागा मिळाली. जवळपास 4तास उभाच होतो.
नांदगावमध्ये उतरलो.अलंकार न्यायला आला होताच.लग्नमंडपात आलो.फेरे घेणे चालू होतं.हेमंतला भेटलो.त्याने जेवणाचा आग्रह केला.मला पण भूक लागलीच होती.पोटभर जेवलो.दोघेही मुक्कामी राहा असं म्हणत होते पण मी नको म्हटले.हेमंतला संगमनेरला कसं जायचे ते विचारले.
तो-तू ज्या मार्गे आलास त्या मार्गे जायला गाडी नाहीये.तू मनमाडला जा.तिथून मिळतील.हेमंतचा निरोप घेतला.अलंकार स्टँडवर आला सोडायला.त्याने गाडीत बसवून दिले.
मनमाडला आलो.तिथं पुण्याला जायला गाडी आहे का अशी चौकशी केली.तो म्हणला आहे 6.45वाजता.डायरेक्ट गाडी म्हणून
जरा निवांत झालो.15 मिनिटांनी जाऊन पुन्हा विचारले की,मला बोटा-आळेफाटा येथे जायचंय.
कंट्रोलर-अरे ती गाडी बाभळेश्वर मार्गे जाणार आहे.
मी-मग आता
तो-ती बघ गुजरात डेपोची शिर्डी गाडी निघाली आहे.शिर्डीला जा तिथून मिळतील पुण्याला जायला.
मग धावतच ती गाडी पकडली.
बसायला जागा मिळाली.तिकीट काढायला पैसे काढले.फक्त 500रुपये उरले होते.कंडक्टर हिंदी बोलणारा होता.मी एक शिर्डी असं बोललो व 500रुपये दिले.50रुपयाचं तिकीट होतं.त्याने मला फक्त 50रुपये दिले.बाकी 400दिलेच नाहीत.मला वाटले, सुट्टे नसतील. नंतर देईल तो.
शिर्डी जवळ आली.मी त्याला बाकी 400रुपये मागितले.
तो-दे दीये है
मी-सिर्फ 50रुपये दिये है
तो-450दिये है
मी-सिर्फ 50रुपये दिये है चाहिये तो चेक किजीए उपर के 400मिले तो बोलना
मग माझ्या शेजारचा एक जण त्याला म्हणला आपने सिर्फ 50दिये है
मग त्याने मला 400रुपये दिले.
जर का हे 400रुपये मिळाले नसते तर ....कल्पनाच करवत नाही.
शिर्डीला आलो.पुणे गाडी लागली होतीच.मामाला काॅल करुन सांगितले.तो म्हणला,"ये तू मी आहे जागा."
मग 11च्या दरम्यान बोटामध्ये पोचलो.मामा न्यायला आला होताच.
ह्या प्रवासातील मला मिळालेली शिकवण -
1)जिथे जाणार तिथल्या नातेवाईक, मित्रांचे नंबर फोनमध्ये घ्या. जवळपासच्या ठिकाणचे पण मित्र-नातेवाईकांचे नंबर असूद्यात. एका डायरीत नंबर लिहून घ्या.काॅल करुन चेक करा नंबर चालू आहे का नाही ते.आता whats app च्या जमान्यात काॅल होत नाहीत आपल्याकडून.
2)प्रवासात मोबाईलवर सोशल मिडीया,गेम खेळणे इ टाळा. मोबाईलची बॅटरी शाबूत ठेवा.पाॅवर बँक असल्यास उत्तमच.
3)मोबाईलमध्ये phonepe,gpay सारखे ॲप ठेवा.ATM कार्ड पण जवळ ठेवा.जास्तीचे पैसे जवळ ठेवा.
4)प्रवासात घरच्यांच्या संपर्कात राहा.
त्यांनाही तुम्ही ज्या मित्र- नातेवाईकांकडे जाणार त्यांचे पण नंबर देऊन ठेवा.प्रवासात जिथे पोचलात ते अपडेट देत जावा.
मुलींनी विशेष काळजी घ्या.
Comments
Post a Comment