Via
जुलै २०१० मधील प्रसंग आहे हा.
मी व माझा मित्र तुषार पौड(ता.मुळशी) पालीला देवदर्शनाला एसटीने गेलेलो.येताना रात्र झाली म्हणून भागाड(ता.माणगाव)ला चुलत्यांकडे मुक्कामी राहिलो.सकाळी माघारी निघणार होतो पण चुलते म्हणाले,"ताईला चिपळूणला नर्सिंगच्या संस्थेत सोडून ये.तिथली व्यवस्था कशी आहे ते पाहा"
तुषारला म्हटले जायचे का ?
तो म्हणला जाऊत.
मग ताई,काकू व आम्ही दोघे निघालो.
माणगाववरुन चिपळूण गाडी मिळाली.अर्धी गाडी रिकामीच होती. महाड सोडले व मुसळधार पाऊस सुरु झाला.एसटी चा ड्रायव्हर सुसाट गाडी पळवत होता.मुळशीमध्ये राहून तुषारने असा पाऊस बहुतेक पाहिला नव्हता.त्याला भिती वाटली.तो जोराने ओरडला-'ड्रायव्हर, गाडी जरा हळू घ्या.'पण ड्रायव्हरला काय आवाज ऐकू गेला नाय. तो त्याच्याच धुंदीत.गाडी चिपळूणमध्ये आली.
चिपळूणला तीन स्टँड आहेत हे पहिल्यांदाच कळाले.नक्की ती संस्था कुठे आहे माहित नव्हते.मग दोन नंबरच्या स्टँडला उतरण्याचा मध्यम मार्ग निवडला.गाडीतून उतरलो व मग रिक्षा करुन त्या संस्थेत आलो.जवळच होते.ताईचे बि-हाड ठेऊन तिचा निरोप घेऊन आम्ही माघारी आलो.बराच वेळ झाला महाड- माणगावला जाणारी गाडी आलीच नाही म्हणजे आम्हा तिघांना बसायला जागा नव्हती.मग माझ्या डोक्यात विचार आला की,माणगावला जायला ट्रेन असेल एखादी.मग रिक्षावाल्याला विचारले की,"काका,माणगावला जायला ट्रेन आहे का आता?"
तो-हो आहे 6 वाजताची.बसा लवकर.
5.30 वाजत आलेले.बसलो.60रु.दिले व स्टेशनवर आलो.तिथे चौकशी केली अन् कळाले की 12वाजेपर्यंत एक पण ट्रेन नाहिये.खूप राग आला त्या रिक्षावाल्याचा.परत दुसरी रिक्षा केली, 60रु.दिले व स्टँडवर आलो.
एक एशियाड बस आली.
माणगाव वरुन सरळ मुंबईला जाणारी.(माणगाववरुन ताम्हीणी घाट मार्गे पुण्याला जायला शेवटची गाडी 'दापोली-महाड-पुणे' 12वाजता होती.ह्या गाडीला माणगावमध्ये नेहमी गर्दी असते, हे माहित होते.)
मग माणगावचे तिकीट न काढता महाडचे तिकीट काढले.कारण दापोली पुणे गाडी महाडवरुनच जाणार होती व तिथे आम्हाला बसायलादेखील जागा मिळण्याची शक्यता जास्त होती.8 वाजता आम्ही महाडमध्ये पोचलो.जेवण केलं व असाच टाईमपास करत बसलो.10.45 झाले.पुण्याला जायला बरीच माणसे दिसत होती.जागा मिळण्याची शक्यता कमी वाटली.दापोली पुणे गाडी आली.आम्ही तिघेही गाडीत चढलो.इतकी गर्दी नव्हती.मी घरुन काॅल आला म्हणून पायरीवरच बोलत उभा राहिलो.कंडक्टर तिकीट काढायला मागे गेला.गाडी आता हायवे ला लागली होती .कंडक्टर तिकीट काढून परत माझ्याकडे आला.
मी-एक भागाड व दोन पौड द्या.
तो-काय?
मी-एक भागाड व दोन पौड द्या.
तो-फौड कुठ आलं हे?
मी-मुळशीच्या पुढे.
तो-अरे,ही गाडी ताम्हीणी मार्गे नाही जात.भोर मार्गे जाते.
मी पाटी पाहिली.खरंच की गाडी भोर मार्गे होती.
तो-काय करु देऊ का स्वारगेटचे तिकीट की इथेच थांबवू.
(आम्ही दोघे असतो तर स्वारगेटला गेलो असतो व तिथून सिटीबसने घरी आलो असतो पण काकूंना भागाडला सोडायचे होते.)मग त्याला म्हटले थांबवा इथेच.मग त्या काळोखात हायवेला कुठेतरी उतरलो.रोड क्राॅसकरुन आलो.आम्ही दोघे गाड्यांना हात करत होतो पण कोणीच थांबेना.बरं झालं पाऊस नव्हता.अशातच एक गाडी थांबली.ॲम्बुलन्स ओमनी होती.
एकाने विचारले-कुठे जायचंय?
मी-महाड.
तिघेही बसलो.
तो-सोबत बाईमाणूस दिसलं म्हणून थांबलो.
मग त्याला सांगीतले काय झालं ते.
त्याने सरळ स्टँडवर गाडी आणली.धावतपळत स्टँडवर आलो.दापोली पुणे काय गेली नव्हती.पाचच मिनिटात गाडी आली.पुन्हा एकदा via चेक केला.
काकूंना भागाडला उतरवले व आम्ही तुषारच्या घरी पहाटे 3.30ला उतरलो.
सांगायचे तात्पर्य हे की,
गाडी कोणत्या मार्गे जाते ते नक्की पडताळून पाहा.नाहीतर आमच्यासारखी फसगत होईल.
Comments
Post a Comment